माननीय चेअरमन यांचे मनोगत

aware yashwant
श्री. किसन केशवराव थोरात

माननीय चेअरमन

सन्माननीय सभासद बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार !!!

आपल्या संस्थेचा ४५ वा वार्षिक अहवाल सर्व संचालकांच्या वतीने आपणासमोर सादर करत आहे.

सहकार आणि महाराष्ट्र ह्या नाण्याच्या दोन बाजु, देशातील सर्वात जास्त सहकारी संस्था हया महाराष्ट्रातच. हया चळवळीतुन संगमनेरचे भुमिपुत्र आदरणीय सहकारमहर्षी थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या बरोबर संस्थेचे संस्थापक मा. श्री. अमोलकचंद पारख, स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी, स्वर्गीय शिवदास मणियार व स्वर्गीय संभाजीराजे थोरात यांचे संस्था उभारणीसाठीच्या योगदानाबद्दल आम्ही ऋणी आहोत.

तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमदार श्री. बाळासाहेब थोरात साहेबांच्या सहकार्याने विविध पायाभुत सोयी सुविधांबरोबरच आदर्श सहकाराचे अमुल्य मार्गदर्शन नेहमीच मिळत असल्याने ही औद्योगिक वसाहत भरभराटीला जात आहे. संस्थेचा सर्वांगीण विकास व सभासदांची प्रगती व रोजगार निर्मिती हे आपले १०० टक्के धेय्य असुन तेच आपले ब्रीद वाक्य आहे.

परोपकाराय फलन्ति उद्योगः ।। आपला भारत देश ५ ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमी कडे वाटचाल करत असताना देशातील एमएसएमई चे जीडीपी मधील योगदान सद्यस्थितीत ३३ टक्के असुन रोजगार निर्मितीतील वाटा ३० टक्के इतका आहे. तसेच निर्यातमधील वाटा ५० टक्के इतका आहे आज मला याचा नक्कीच अभिमान आहे की आपण याचे भागीदार आहोत.

एक इंजिनिअर व सरकारी कॉन्ट्रॅक्टर म्हणुन रस्ते, इमारती व विविध सरकारी योजनांचे काम करत असताना राष्ट्रउभारणीच्या कामाला हातभार लागल्याचे समाधान नक्कीच मिळत असते. संस्थेचा अध्यक्ष म्हणुन रोजगार, व्यवसाय, परीसराचा विकास व नविन पिढीतील उद्योग व्यवसाय घडविण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे धैर्य व सामर्थ्य नक्कीच आहे.

लवकरच संगमनेर हे औद्योगिक दृष्ट्या पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद हया औद्योगिक वसाहतींसाठी महत्वाचे ठिकाण असेल आणि यासाठी आमचे प्रयत्न असतील.

भविष्यात आपल्या औद्योगिक वसाहतीमधुन देशाला अभिमान वाटावा व औद्योगिक वसाहतीचा नावलौकीक व्हावा येथील उद्योगांच्या नावाने वसाहत ओळखली जावी असे उद्योग येथे नक्कीच घडतील. या संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या दरम्यान शेतकरी विकास मंडळाच्या वतीने संस्थेचा सर्वांगीण विकास, सभासदांची प्रगती, तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार, उद्योजकांना आपआपसातील सद्भाव वाढविण्यासाठी निवडणुकच्या जाहिरनाम्यातील पुर्ततेसाठी कटीबद्ध आहोत. त्याचबरोबर संस्थेच्या प्रगतीसाठी वेळोवेळी येणा-या संधी स्विकारत व आव्हाने पेलत आपले संचालक मंडळ येत्या पाच वर्षात अमुलाग्र बदल करत संस्थेच्या माध्यमातुन उद्योग, रोजगार, उत्पादन यामध्ये किमान ५० टक्के प्रगतीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

यासाठी सर्व उद्योजक सभासद, संचालक मंडळ व संस्थेचे कर्मचारी यांची मोलाची साथ नक्की लाभत आहे. व भविष्यातही संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीचे कुटुंब यशाच्या शिखरावर असेल अशी ग्वाही देतो.

आपला विश्वासू,
श्री. किसन केशवराव थोरात
चेअरमन